भाजप नगरसेविकेचा छळ झाल्याचे सिद्ध

Media Logo_Sakal

राज्य महिला आयोगाचे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र मुंबई- राजकीय पक्षांतील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनाही समोर येत आहेत. शिवसेनेपाठोपाठ भाजपमधील महिलाही सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. डोंबिवली पश्‍चिम येथील भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांचा शारीरिक छळ झाल्याचे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारे होणाऱ्या छळाची तक्रार करण्यासाठी पक्षांतर्गत समितीही नाही. राज्य महिला आयोगाने याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. कोठावदे यांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले होते. नियमांनुसार याबाबत अधिक, तपशीलवार चौकशी व्हावी यासाठी आयोगाने “मजलिस फाउंडेशन‘ या स्वयंसेवी संस्थेच्या ऍड. फ्लेव्हिया ऍग्नीस, ऍड. निलंजना शाह, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा शलाका साळवी यांची समिती नियुक्‍त केली होती. या समितीने राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला असून, कोठावदे व त्यांच्या कुटुंबाचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे समितीने मान्य केले आहे. त्यांच्या मुलावर झालेल्या अत्याचाराचीही समितीने दखल घेतली आहे. महिला आयोगाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार कोठावदे यांचा कल्याण- डोंबिवलीतील भाजपचे आमदार राजेंद्र चव्हाण यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. समितीसमोर आठ सुनावण्या झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे कल्याणमधील नगरसेवक रवींद्र पाटील, शिवसेनेचे नाशिक नगरसेवक अजय बोरसाटे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष रजत राजन आणि पक्षाचे कार्यकर्ते दिनेश दुबे, मयुरेश शिर्के, मयुरेश भाटे हे दोषी आढळले आहेत. अर्चना कोठावदे यांच्या मुलाला मानसिक त्रास देणे, माध्यमांना खोटी माहिती देणे, त्यांना व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील मेसेज पाठविण्यासारखे आरोप सिद्ध झाले आहेत. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या पत्रात भाजपमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात काम करणारी तक्रार निवारण समिती नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भाजपच्या प्रतिसादाकडे लक्ष महिलांना राजकारणात केवळ आरक्षण उपयोगाचे नसून, त्यांना संरक्षणही देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.

This article originally appeared in Sakal Times. You can read the original article here.

teenbandarभाजप नगरसेविकेचा छळ झाल्याचे सिद्ध